Deepak Chopra blog - Satyavan-Savitri story

Death at the Door - Satyavan-Savitri story

Comments

Bappa Morya Re!

Comments

हळदीने डोके (बुद्धी) तल्लख होते (राहते)

आज माझ्या RSS reader मधे “Popular curry spice is a brain booster” हा मथळा माझ्या नजरेस पडला. मग मी त्याचा पाठलाग करत New Scientist या UK मधल्या प्रख्यात मासिकाच्या web site वर पोहोचलो. तिथे दिलेल्या या बातमीत (link) वैज्ञानिकांचे असे मत आहे कि हळद खाल्ल्याने मेंदू “तरतरीत” राहतो. Alzheimer पासून बचाव होण्यासाठी याचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. थोडक्यात, सिंगापूरमधे काही वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे आढळले कि
“Curcumin, a constituent of turmeric, is an antioxidant, and reports have suggested that it inhibits the build-up of amyloid plaques in people with Alzheimer’s.”

Comments (1)

Rain in Mumbai! July 2/3/4/5/6, 2006

 

 

Comments

आठवणी पत्त्यांच्या !!! -वेदश्री

काल एकाला कॉम्प्युटरवरचा “solitair” हा पत्त्यांचा गेम खेळताना पाहिलं आणि नकळत मनात दडलेले पत्ते बोलायला लागले…

खेळातून अभ्यास शिकवताना आईनी वापरलेल्या अनेक गमतींमधली एक गंमत म्हणजे पत्ते…. तिनी मला “penalty”चा डाव शिकवला… बरच काही खेळायची ती माझ्याशी… पण संध्याकाळी तिला वेळ नाही म्हटलं की माझा बाबांच्या मागे लकडा सुरू व्हायचा की “चला ना बाबा, पेनल्टी खेळुयात ना ओ..” मूड छान असला तर तेही म्हणायचे..”हं आण बेट्या पत्ते… खेळुयात..” मग लगेच डाव मांडला जायचा आणि खेळ सुरू व्हायचा…थोडावेळ ठीक चालायचा..पण मग बाबांच्या खोड्यांना सुरुवात व्हायची… मध्येच हातातले पत्ते पिसून टाकायचे…”काय ओ बाबा? असे पत्ते पिसायचे नसतात कै मध्येच…”"हो का ?…. माहितच नव्हतं रे राजा मला… आता एकदम नीट खेळतो हं…” या बाबांच्या भोळेपणावर विश्वास ठेवून परत खेळायला सुरूवात व्हायची.. पण कसलं काय? परत सुरू व्हायच्या खोड्या… आणि मग मात्र…”तुम्ही असंच करणारे का ओ बाबा? जा बाबा.. अशानी मी तुमचं नाव आईला सांगेन हं…”या रामबाणाचं रुपान्तर बाबांच्या मोठ्ठ्या हसण्यात , आणि मग माझ्या फ़ुरंगटण्यात व्हायचं…. “ बरं बेट्या , आता अज्जिब्बात नाही असं करणार…” मग seriously खेळ सुरू व्हायचा ( म्हणजे माझ्या नकळत पत्ते पिसत !!!! ) मग डावावर डाव बाबाच जिंकायचे…. केवढा मोठा हा गुन्हा तो ( !!! ) … “जा बाबा , तुम्हीच जिंकता सारखे… मला जिंकूच देत नाही…. “मी एकदम रडवेली व्हायचे…. “इतक्या लवकर थकला का बबड्या… असं नाही करायचं… थकायचं नाही… प्रयत्न करत राहायचे… बघ तू नक्की जिंकशील… बघ मी डाव मांडलाय.. चल जिंकायला तयार हो…”बाबांचे हे विश्वासाचे शब्द मला खेळायला उद्द्युक्त करायचे… आणि मी खेळायला लागायचे… हरत जायचे… पण पुढचा डाव नक्की जिंकेन या भरवशावर मनापासून खेळत राहयचे… ११ वाजून जायचे रात्रीचे… आई येऊन म्हणायची…. “ए चल गं किती वेळ खेळणारेस अजून? बाबांना सकाळी काम आहे राजा… चला आता हा डाव शेवटचा बरं का?”"ए थांब की गं आई… मी जिंकेन तो डाव शेवटचा असणारे बघ… मी जिंकत नाही तोवर डाव नाही थांबू देणार… प्रयत्न करत राहणार… बरोबरे की नै ओ बाबा? ” बाबांना माझा हेतू लक्षात यायचा… मिश्किल हसून म्हणायचे “हो रे माझ्या राजा .. एकदम बरोबरे तुझं…”आणि मग डाव ”शेवटचा”ठरण्यासाठीच सुरू व्हायचा !!!

शाळेत संस्कृत सुभाषितं पाठ व्हायच्या अगोदर “अष्ट एक्का , त्रयो राजा , सप्त राणी , चतुर गुलाम , सैया दैया , दुर्री नैया , पंचमी समाप्त: “हा पत्त्यांच्या जादूचा मंत्र तोंडपाठ झालेला…( हा मंत्र माहित नसलेल्यांना सांगते… या मंत्राप्रमाणे पत्ते लावायचे आणि एकाआड एक पत्ता काढत जायचा…आपोआप एक्का , राजा , राणी , गुलाम पासून सुरू होऊन तिर्री दुर्री पर्यंत पत्ते निघत जातात… आहे ना जादू?)… विज्ञानाचे प्रयोग कशाशी खातात माहित व्हायच्या अगोदर…पत्ता पाण्यात भिजवून त्याचे दोन भाग करून त्यात चपटं लोहचुंबक ठेवून परत चिटकवून टाकून पत्त्यांच्या अख्ख्या कॅटमधून अंतर्ज्ञानानी (!!!) समोरच्यानी निवडलेला पत्ता शोधून दाखवायचं कसब अवगत झालेलं होतं… पत्त्यांचा किल्ला करण्यात तर आमच्या जिद्दीचा , चिकाटीचा जो काही कस लागायचा , तो तर असा सांगून नाही कळायचा… आपला पत्त्यांचा तासभर घालवून बनवलेला किल्ला हवेच्या एका छोट्याशा झुळकेनी जमीनदोस्त झालेला अनुभवला आणि मग दुसर्‍यांचा किल्ला बनत आलेला असताना गंमत म्हणून लावला जाणारा पंखा , बंद राहायला शिकला आणि उलट चुकार हवेला परवानगी देणारी खिडकी बंद व्हायला लागली….

शाळेच्या सुट्ट्यांमध्ये कधी घरात , कधी शेजार्‍यांकडे , कधी जिन्यात तर कधी गच्चीवर पत्त्यांचे डाव रंगायचे… बदामसात , गुलामचोर , राजाभिकारी वगैरे तर असायचेच ( आमच्यापेक्षा छोटी मुलं आली की हे डाव असायचे…) पण आम्हा मोठ्यांमध्ये (!!!) मात्र रम्मी , हुकुम , वक्खई , झब्बू ( कधी एकेरी तर कधी गड्डा ), कधी ५-३-२ , हे डाव चालायचे …. १३-१४ जणांमध्ये एका कॅटमध्ये एकेरी झब्बू खेळायचा… सहीच मजा येते..पहिल्या उतारीचा इस्पिक एक्का ज्याच्याकडे आला , तो खपलाच समजायचा :)) …… कारण पत्ते ते किती …५२ आणि १३-१४ जणांमध्ये प्रत्येकाला प्रत्येक प्रकारचा एकेक पत्ता तरी मिळेलालाच असेल अशी अपेक्षा करणं म्हणजे घोड्याला शिंग शोधण्याचाच प्रकार…. मग काय?… पहिल्याच उतारीला झब्बू सुरू…. इस्पिक एक्क्यानी सुरूवात म्हणून एक्केवाला जेSSSS गाडला जायचा झब्बूच्या पत्त्यांनी की वर यायला जागाच मिळायची नाही… :)) ….

रम्मीतही तोच प्रकार…कधीकधी जोकर महाराज हरवलेले असायचे…मग कॅट मधूनच एक पत्ता काढून त्याच्या किंमतीचे उलट रंगाचे पत्ते जोकर बनायचे… आणि सध्ध्याचा जोकर काये ते लक्षात न राहाता चुकुन जोकरच खाली टाकला जायचा…. मग टाकणाराची झालेली फजिती आणि उचलणाराची झालेली चंगळ …. आणि यावरून झालेली ती भांडणं……

पत्त्यांवर मुद्दाम वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या खुणा… त्यावरून ओळखलेले समोरच्याचे पत्ते…आणि कधी अचानक गुलामचोर खेळताना “हं… मला नकोय ती तुझी बदामची दश्शी… तू मुद्दाम का वर काढून ठेवतेयस ती..? ” असं चुकून तोंडातून निघून गेल्यावर हातातले पत्ते टाकून मला मारायला धावलेली ती…. आणि पत्त्यांच्या डावाला रामराम ठोकून सुरू झालेली ती पकडापकडी…..

शाळेत चुकून एखादा सिद्धांत सिद्ध नाही करता आला तरी बेहत्तर पण हुकुम खेळताना कोणी कोणाचे किती हात ओढले याचं गणित कधीच चुकायचं नाही… हुकुमामध्ये तर अजुनच मजा यायची जेव्हा जोडीजोडीनी खेळलं जायचं… समोरासमोरचे partners असायचे… मग आपल्याकडचा “हुकुम” पार्टनरला सांगायला काय काय त्या खाणाखुणा …. हळुच हसलं की “इस्पिक”, मिश्किल हसलं की “बदाम”, डोळे मिचकावले की “किलवर”आणि तोंड वाकडं केलं की “चौकट” … :)) …. आपल्याकडचा हुकुम पार्टनरकडेपण पण दमदार आहे की नाही हे समजून घ्यायला अजून वेगळ्या खाणाखुणा असायच्या… आणि परत हे सगळे झमेले पत्ते वाटून होइपर्यंतच उरकायचे.. तेही कोणाला लक्षात येणार नाही अशा प्रकारे…. पार्टनरला चष्मा असण्यातला फायदा अशा वेळेस प्रखरतेनी जाणवतो.. :))…. आपल्या हातात हुकुम जबरदस्त असेल तर “आपण जिंकलोय गं… मदत कर फक्त… सबकुछ under control है बॉस… डन डनाड्डन डन आहे एकदम…. आहेत नाहित तितके सगळे हात आपले आहेत……”असा आनंद एकदम दणक्यात व्यक्त व्हायचा… आणि कधी ठरलेले हात मिळवू शकलो नाही की …. “अगं घाबरतेस कशाला ? मी आहे ना…. पुढच्या डावात सगळे हात देऊन टाकू बोटांसकट परत…. आहे काय आणि नाही काय? ” अशा प्रकारे दु:ख पण त्याच खेळीमेळीनी वाटून घेतलं जायचं….

कॉलेजमध्ये जायला लागल्यावर अभ्यासापुढे वेळेचा तुटवडा पडायचा..पण सुट्टीत वेळात वेळ काढून पत्ते खेळायला मजा यायची… आता रम्मी , हुकुम , झब्बूपेक्षा “चॅलेंज”नी वेड लावलं होतं…. नशिबापेक्षा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिकवणारं “चॅलेंज”… आमचा कंपू पण अस्सला भारी की एकाच कॅटमध्ये खेळत असतानाही मुलांकडून एकूण १६-१७ राण्या (!!!!!) आम्ही चॅलेंज न देता खपवून घेतलेल्या असतानासुद्धा परत पुढच्या उतारीच्या वेळेस त्यांच्या अजून ४ राण्या लावायचा त्यांचा त्साह आणि साहस अवर्णनीय असायचं …. पण आम्हां मुलींकडून झालेल्या दुसर्‍याच राजाच्या उतारीला मात्र एकदम न राहावून , घाईघाईमध्ये “चॅलेंज”मिळायचं !!!

अभ्यास , करीअर आणि अजून छोटे असूनही मोठे भासणारे प्रश्न सोडवताना “Bridge” शिकायची खूप्प इच्छा असूनही वेळ कसा तो मिळालाच नाही… असाच एक अनुभव ज्यासाठी मन नेहमीच आसूसलेलं आहे तो म्हणजे बस किंवा रेल्वेमध्ये घोळक्यात बसून रंगलेला पत्त्यांचा डाव अनुभवणे… या अनुभवांची पोकळी भरून निघायच्या आधीच ते “माझे”पत्ते हरवले आणि फक्त कॉम्प्युटरवरचेच पत्ते उरले आता आयुष्यात …. घरी एकटी असल्यावर “पेन्शन”तरी खेळू शकायचे पण आता या आयुष्यात माझे ते “खरे” पत्ते कुठेतरी हरवून गेलेत आणि माझ्यासोबत उरल्यात फक्त माझ्या त्या पत्त्यांच्या आठवणी !!!! 

                                                              -वेदश्री

Comments

बंपर स्टिकर्स

१. कुत्र्याला घेऊन निघालेली बायको हरवलीये… कुत्र्याला शोधून आणून देणाऱ्यास इनाम.

२. मी खोटं बोलणं, दारू पिणं, स्मोकिंग आणि बायकांचा नाद सोडला…ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट १५ मिनिटे होती!!!

३. पैसा बोलता है, म्हणतात ते खोटं नाय… मला पैसा नेहमी म्हणतो, ‘गुडबाय’!!!!

४. मी एकदम परफेक्ट शेपमध्ये आहे…गोल हा एक शेपच आहे की नाही!!!

५. संध्याकाळची गदीर् चुकवायची असेल, तर दुपारीच ऑफिसातून घरी निघायला शिका!!!

Comments

जे. कृष्णमुर्ती यांचे तत्वज्ञान

जिद्दु कृष्णमुर्ती किंवा जे कृष्णमुर्ती ह्यांनी जगण्याचे जे निराळे तत्वज्ञान मांडले आहे त्यासंबधी इथे लिहिण्याचा विचार आहे
“सत्य हे शब्दात पकडता येत नाही, सत्य, चिरंतन सत्य हे प्रत्येकाला हुडकावे लागणारे ‘ दिशाहीन रान’ आहे ”

” स्वातंत्र्य म्हणजे कोणती प्रतिक्रिया नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे कोणताही पर्याय नव्हे. आपल्याला खूप सारे पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपण स्वतंत्र आहोत हा मानवाचा भ्रम आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ शुध्द निरीक्षण.कोणत्याही दिशेखेरिज. फ़ळाची अपेक्षा आणि अपेक्षभंगाची भीति या दोहोपासून मुक्त असे निरीक्षण. असे स्वातंत्र्य हे उद्देशहीन असते. स्वातंत्र्य हा मानवाच्य उत्क्रांतीमधला शेवटचा टप्पा नव्हे, ते तर त्याच्या अस्तिवाच शोधाचे पहिले पाऊल आहे”
“विचार म्हणजेच काळ. विचार हा पूर्वानुभव आणि ज्ञान यातून निर्माण होतो..म्हणूनच विचार हा भूतकाळापासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणूनच विचारांना नेहमी मर्यादा पडतात आणि आपण भूतकाळाचे गुलाम बनतो आणि स्वतचे आयुष्य भूतकाळाशी संघर्ष करण्यात घालवतो”
“जेव्हा आपल्याला स्वताच्या विचारांच्या प्रवाहाची खर्‍या अर्थाने जाणीव व्हायला लागते, तेव्हा आपल्याला निरीक्षण आणि निरिक्षणकर्ता, अनुभव आणि अनुभव घेणारा, विचार व विचार करणारा यातले द्वैत जाणवायला लागते. हे द्वैत जेव्हा संपेल तेव्हाच खर्‍या अर्थाने शुध्द निरिक्षण सुरु होऊ शकेल. यातूनच कालातीत जीवनद्रुष्टी निर्माण होईल. ज्या वेळी भूतकाळने पछाडलेल्या विचारांना आपण नाकारू, तेव्हाच खरे प्रेम अस्तिवात येऊ शकेल.”

Comments

कौसल्येचा राम आणि कबीर

कौसल्येचा राम आणि कबीर यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे आज (रविवार, ११ जून) ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा - वटपौर्णिमा. सुमारे ६०६ वर्षांपूर्वी (इसवी सन १४०० मध्ये) याच दिवशी कबिरांचा जन्म झाला. “जेठ सुधी बरसायत को पूरणमासी प्रकट भए’ हे वचन कबीरपंथी लोकांत प्रसिद्ध आहे. “बरसायत’ म्हणजे वटसावित्री. ……..
कबिरांचा राम हा कौसल्येचा राम कधीही नव्हता. ग. दि. माडगूळकरांनी एका चित्रपटातील गाण्यात “कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम…’ असे म्हटले आहे. ही निव्वळ कविकल्पना आहे. जर कबिराला रामाचे सगुण-साकार रूपच मान्य नाही, तर तो कबिराचे शेले विणावयास कसा येईल? कौसल्येचा राम म्हणजेच दाशरथी राम. या रामाबद्दल कबिरांनी अगदी स्पष्ट शब्दांत आपले मत नोंदविले आहे. कबीर म्हणतात - “दशरथसुत तिहुँ लोक बखाना, रामनाम का मर्म है आना’ म्हणजे दशरथसुत रामाचे गुणगान तिन्ही लोकांत केले जाते; पण खऱ्या रामाचे स्वरूप वेगळेच (आना) आहे. हा खरा राम म्हणजे आत्माराम. कबिरांच्या मते परमेश्‍वर निर्गुण निराकार आहे. तुलसीदासांनीही राम हा ब्रह्मस्वरूप आहे, हे तत्त्वतः मान्य केले आहे. त्यांच्या मते निर्गुण- निराकार ब्रह्म भक्तांच्या आनंदासाठी सगुण- साकार रूप धारण करते; परंतु कबिरांना अवतार ही कल्पनाच मान्य नाही. त्यांच्या मते हा राम सर्व विश्‍वात आणि प्राणिमात्रांत व्यापून राहिला आहे. एका पदात ते म्हणतात - “घट घट में वह साईं रमता कदुक वचन मत बोल रे!’ म्हणजे “प्रत्येक शरीरात (घट) परमात्मा आहे. म्हणून सर्वांशी गोड बोला, सर्वांवर प्रेम करा.’

जर प्रत्येकाच्या शरीरात परमात्मा आहे, तर तो माणसाला ओळखता का येत नाही? कबिरांच्या मते याचे कारण आहे अज्ञान. ज्याप्रमाणे तुकाराम म्हणतात - “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी.’ त्याचप्रमाणे कबीर म्हणतात, “परमात्मा तुमच्याजवळ असूनही तुम्ही त्याला शोधण्यासाठी मंदिर, मशीद किंवा तीर्थक्षेत्रे यांच्या यात्रा करता.’ कबिरांनी यासाठी कस्तुरीमृगाचा दृष्टान्त दिला आहे. कस्तुरी मृगाच्या नाभीतच असते; पण तिचा वास कोठून येतो, हे शोधण्यासाठी हरीण जंगला जंगलातून भटकत राहते. त्याचप्रमाणे परमेश्‍वराचा शोध घेण्यासाठी माणूस नाही नाही त्या ठिकाणी हिंडत राहतो.

कबीर म्हणतात -
कस्तूरी कुंडल बसै मृग ढूँढे बनमाहि।
ऐसे घट में पीव है दुनिया जाने नाहिं।।

म्हणजे कस्तुरी मृगाच्या नाभीत (कुंडल) असते; पण मृग तिचा शोध घेत घेत साऱ्या वनात फिरत राहतो, त्याचप्रमाणे (ऐसे) माणसाच्या शरीरात (घट में) परमात्मा (पीव) आहे; पण जग त्याला ओळखत नाही.

दुसऱ्या एका पदात कबिरांनी परमेश्‍वरालाच बोलते केले आहे. कबिरांचा हा परमेश्‍वर म्हणतो,

“ना मैं मसजिद, ना मैं मंदिर, ना काबे कैलास में।
खोजी होय तो तुर तै मिलि है पल भर की तालास में।।’

अर्थात मी मंदिरात किंवा मशिदीत नाही. काबा (मुसलमानांचे पवित्र स्थान) किंवा कैलास (हिंदूंचे तीर्थक्षेत्र) या दोन्ही ठिकाणी माझे वास्तव्य नाही. जर तुम्ही बारकाईने माझा शोध घेतला (खोजी होय तो) तर एका क्षणात मी तुम्हाला सापडू शकेन. याचा अर्थ हाच, की माणसाने स्वतः अंतर्मुख होऊन पाहिले तर परमेश्‍वराचा साक्षात्कार होण्यास वेळ लागणार नाही (पल भर की तालास - क्षणार्धात घेतलेला शोध). भगवद्‌गीतेत हेच सत्य भगवंतांनी उलगडून दाखविले आहे. ते अर्जुनाला (म्हणजे सर्वांनाच) समजावून सांगतात - “ईश्‍वरो सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठत्यर्जुन।’

परमेश्‍वर प्रत्येकाजवळ असला तरी त्याची ओळख सर्वांनाच सहजासहजी पटत नाही. ही पटवून देण्याचे काम सद्‌गुरूचे. म्हणून कबिरांच्या मते परमेश्‍वरापेक्षाही गुरूचे महत्त्व अधिक आहे. जर गुरू आणि परमेश्‍वर हे दोघेही माझ्यासमोर (म्हणजे कबिरांसमोर) येऊन उभे ठाकले तर कोणाला प्रथम वंदन करायचे? कबिरांच्या मनात याविषयी तिळमात्र शंका नाही. ते म्हणतात, की मी सद्‌गुरूलाच प्रथम वंदन करणार. कारण परमेश्‍वराच्या खऱ्या (निर्गुण- निराकार) स्वरूपाची ओळख मला सद्‌गुरूनींच करून दिली आहे. या संदर्भात त्यांचा पुढील दोहा अत्यंत प्रसिद्ध आहे. ते म्हणतात -

गुरू गोविंद दोऊँ खडे का कै लागौं पाय?
बलिहारी गुरू आपकी जिन गोविंद दियो बताय।।

परमेश्‍वर निर्गुण- निराकार आहे; पण त्याला ओळखण्यासाठी एखाद्या नावाची आवश्‍यकता आहे. कबिरांच्या मते खरे तर परमेश्‍वराची असंख्य नावे आहेत. ते म्हणतात - “अल्ला राम करीम केसव हरि हजरत नाम धराया।’ तथापि यापैकी एकच नाम अगदी सोपे, सुटसुटीत आणि लोकांनासुद्धा प्रिय आहे. ते म्हणजे “राम’! तथापि हा राम कौसल्येचा राम नाही, हे वरील विवेचनावरून स्पष्ट झालेच आहे. त्यामुळे तो कबिरांचे शेले विणणार नाही, हे निराळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. तथापि एका अर्थाने ते खरे मानता येईल. कबीर रामाचे अस्तित्व प्राणिमात्रात (घट घट में) मानतात. त्यामुळे कबिरांच्या हृदयातील राम त्यांच्याकडून शेले विणून घेतो, असे म्हणणे कबिरांच्या तत्त्वज्ञानास धरून होईल.

- डॉ. सच्चिदानंद परळीकर

Comments

विवेकचूडामणि - Attachment to sense objects

शब्दादिभि: पञ्चभिरेव पञ्च
पञ्चत्वमापु: स्वगुणेन बद्धा: ।
कुरङ्गमातङ्गपतङ्गमीन-
भृङ्गा नर: पङ्चभिरङ्जित: किम् ।।७६।।

The deer, the elephant, the moth, the fish, and the honey-bee - these five are annihilated because of their slavery to one (or the other) of the senses, such as sound etc., through their own attachment (to it). What then is the condition of man who is attached to all these five (senses)?

Notes:
Trappers lure deer with pleasing sound (शब्द); an elephant is trapped when it is lost in enjoyment of rubbing against the trees (स्पर्श); moth is attracted to light, which leads to its death (रूप); fish is hooked when it chases food (taste, रस); bee is trapped because of its attaction to fragrance (गंध).

Comments

माझे वडील …

‘ माझे वडील अतिशय साहसी होते,’ संता सांगत होता, ‘ते एकदा एका वाघाच्या पिंजऱ्यात शिरले…’
‘ बापरे,’ कौतुकानं थबथबलेल्या चेहऱ्यानं बंता म्हणाला, ‘कमाल आहे यार. मग, ते बाहेर कसे आले?’

‘ चालत चालत’, संता शांतपणे म्हणाला, ‘वाघाला पिंजऱ्यात आणण्याची वेळ झाली, तेव्हा त्यांना हुसकावून काढलं तिथल्या रक्षकांनी!!!!’

‘ माझे वडील तर तुझ्या वडिलांपेक्षाही धाडसी होते,’ बंता सांगू लागला, ‘ते तर एका सिंहाच्या पिंजऱ्यात शिरले होते एक दिवस.’

‘ काय सांगतोस काय?’ वैषम्य आणि कौतुकानं भरलेल्या चेहऱ्यानं संतानं विचारलं, ‘मग ते बाहेर कसे आले?’

‘ ते बाहेर आले असं म्हणालोय का मी?!!!’

Comments

« Previous entries